नाशिक : राज्यात सत्ता आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या सत्तापदावर वर्णी लागण्याची स्वप्ने पाहणाºया कार्यकर्त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. राज्यस्तरीय महामंडळे दूरच, परंतु जिल्हास्तरीय समित्यांची पुनर्रचनाही होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. काहींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्वप्ने पडू लागली होती. परंतु जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत प्रामुख्याने सक्षम उमेदवारीच्या नावाखाली आयारामांना तिकिटे देण्यात आली. त्याचवेळी बहुतांशी कार्यकर्त्यांना दुसरीकडे सत्तापदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु विशेष कार्य अधिकारीपदाशिवाय काहीच पदरात पडले नाही. जिल्हास्तरावर पुरवठा दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शासकीय रुग्णालय समिती अशा अनेक समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केले जातात. तेथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकत असताना पक्षातील आमदार त्रयींमधील असमन्वयाचा फटका कार्यकर्त्यांना बसत आहे.
शासकीय समित्यांवर नियुक्त्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:34 IST