नाशिक : नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला गत आठवड्यात मिळालेल्या दहा हजार अॅँटिजेन किटचा होत असलेला प्रभावी उपयोग पाहून नाशिक महापालिकेने एक लाख अॅँटिजेन किट मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दहा मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या या किटचा वापर प्रामुख्याने हायरिस्क पेशंटसाठी तसेच कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांसाठी करता येत असून, झटपट अहवालामुळे हे किट कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रभावी भूमिका निभावण्याची शक्यता आहे.नाशिक महानगरात दररोज दोनशेहून अधिक बाधित रुग्ण आढळू लागल्याने तसेच अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाणातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. महानगरात वाढत असणारे बहुतांश रुग्ण हे बाधितांच्या नात्यागोत्यातील आणि निकटवर्तीयांपैकी आहेत. अशा परिस्थितीत बाधितांच्या निकटवर्तीयांच्या जर झटपट चाचण्या झाल्या आणि त्यात जे बाधित आढळतील त्यांना त्वरित दाखल करून घेतले तर बाधितांची पुढील साखळी संपुष्टात येऊन दररोजच्या बाधितांचे प्रमाण नियंत्रणात येणे शक्य होऊ शकणार आहे. बाधितांच्या संपर्कातील आणि संशयितांची चाचणी त्वरित झाल्यास अशा रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखता येऊ शकतो, ही या अॅँटिजेन किट चाचणीची सर्वाधिक सकारात्मक बाजू आहे. मनपा आयुक्तांनी वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरकडे सुमारे दहा हजार टेस्टिंग किटची मागणी केली होती. त्या किट प्राप्त झाल्यानंतर प्रारंभीच्या टप्प्यात दररोज २०० अॅँटिजेन किटद्वारे तपासणी केली जात होती. मात्र, आता त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्या प्रमाणातही वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच या अॅँटिजेन किट एक लाख मागविण्याचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याशिवाय नाशिक महापालिकेकडून आयसीएमआरकडे अॅँटिबॉडी टेस्ट किटचीदेखील मागणी करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत त्या टेस्टकिटदेखील नाशिकला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास आणि कंटन्मेंट झोन, हायरिस्क पेशंट किंवा बाधितांचे निकटवर्ती संशयित यांच्या चाचण्या झटपट होऊन नाशकातील कोरोनाला काही प्रमाणात तरी आळा घालणे शक्य होणार आहे.