नाशिक : आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कुंभमेळ्यासाठी सर्व निधी शासनानेच द्यावा, अशी मागणी करणाऱ्या महापालिकेला राज्य शासनाने आर्थिक मदत तर नाहीच आणखी ४७ एकर क्षेत्राचा मोबदला देण्यासाठी भुर्दंड सोसण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्यासाठी तीनशे एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव होता. महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने राज्य शासनानेच भूसंपादन करून मोबदला द्यावा, असा ठराव महासभेत करून महापालिकेने साधुग्रामच्या जागा आरक्षण प्रस्तावात पाठविल्या होत्या. गेल्यावर्षी १६७ एकर क्षेत्राचे भूसंपादन करताना राज्य शासनाने राजपत्रात माहिती प्रसिद्ध करताना या जागेसाठी मोबदला महापालिका देईल, अशी व्यवस्था केली. त्यानंतर बोनस टीडीआर देण्यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव मागितला; परंतु त्यावर निर्णय घेतला नाही. आता कुंभमेळ्यासाठीच रहिवासी क्षेत्रातील आणखी ४७ एकर क्षेत्र भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेवर टाकली आहे. या क्षेत्रासाठी राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध करतानाच भूसंपादन करणारी प्राधिकृत संस्था म्हणून महापालिका नमूद केले आहे.दरम्यान, सदरचे क्षेत्र आरक्षित करण्यासाठी महापालिकेने हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही पूर्ण केली असून, हा आरक्षण टाकण्याच्या अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेत प्रस्ताव मांडला आहे. (प्रतिनिधी)
पालिकेला आणखी एक भुर्दंड
By admin | Updated: June 20, 2014 01:17 IST