वणी : दिंडोरी तालुक्यात असमाधानकारक पावसामुळे हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने, चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पशुपालन व्यवसाय प्रतिकूल परिस्थितीत सापडला आहे. तालुक्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीव्यवसायास दिलासा मिळाला. मात्र, उशिरा आलेल्या पावसाने व तितकासा जोर नसलेल्या पावसाने पशुपालन व्यवसायाचे गणित बदलून टाकले आहे. कारण उशिरा आलेल्या पावसामुळे जनावरांना खाण्यायोग्य असणारा हिरवा चारा जमिनीत उगविण्यास कालावधी असल्याने पर्यायी महागडा चारा व खाद्य खरेदी करावे लागत आहे. सध्या हिरव्या बांड्या (ऊस) प्रतिकिलो सुमारे पाच रुपयांत विकत घ्यावा लागतो आहे. सुक्या गवताच्या गाठी प्रतिकिलोसाठी ४५ रुपये सरकी ढेप ३५ रुपये किलो कांडी नावाचे खाद्य २८ रुपये प्रतिकिलो भाताचा कोंडा १६ रुपये तर जनावरांसाठीचे पीठ १७ रुपये किलो, तसेच गव्हाचा भुसा वीस रुपये प्रतिकिलो असे दर मागील वर्षी होते. या वर्षी त्यात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने, नाईलाजाने पशुपालन व्यवसायाला स्थैर्य देण्यासाठी महागडे पशुखाद्य खरेदी करावा लागत असल्याची माहिती दूध उत्पादक जाधव यांनी दिली. सध्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूधविक्री व्यवसाय हा पांढरा हत्ती पोसण्यासारखे असून, नाईलाजाने मुक्या जनावरांचा उदरनिर्वाह चालविणे म्हणजे घर घालून धंदा असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
--------------
जनावरांचे खाद्य महागले
प्रतिवर्षी जनावरांच्या खाद्याचे दर नियंत्रणात असायचे. मात्र, उशिरा आलेल्या पावसामुळे गणित बदलले असून, चाऱ्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहिती येथील दूध उत्पादकांनी दिली. महागड्या पशुखाद्याचे पर्याय हे आर्थिक घडी विस्कटणारे असल्याने पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकांना पर्यायी व्यवसाय सुरू करणे जिकिरीचे असून, सुगीचे चांगले दिवस दुग्ध व्यवसायाला येतील, या आशेवर दुग्ध व्यावसायिक आहेत.