ब्राह्मणगाव : लष्करी अळीने मका पिकावर सर्वत्र थैमान घातले आहे. त्यावर शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फवारण्या करूनही अळी आटोक्यात येत नसल्याने मका पिकावर मोठे संकट आले आहे. सर्व उपाययोजना निष्फळ ठरल्याने येथील शेतकरी बाळासाहेब अहिरे यांनी तीन एकर मका पिकावर नांगर फिरविला आहे.मका पेरणीपासून आजपर्यंत खर्च पाहता व लष्करी अळीमुळे विविध प्रकारच्या हजारो रु पयांच्या औषध फवारण्या करून पीक हाताशी येणार नाही, हे लक्षात येताच उद्विग्न झालेल्या अहिरे यांनी पिकात रोटर फिरविला आहे. तीन एकर मका पिकासाठी ४९ हजार दोनशे रु पये खर्च केला असून, केलेला खर्च पूर्णत: निष्फळ ठरला आहे. मका पीक मोठे झाल्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक घेतल्यानंतर निव्वळ खर्चही सुटणार नाही अशा विवंचनेत असलेल्या अहिरे यांनी हे पाऊल उचलले. मका हे पीक कसमादे परिसरातील नगदी पीक असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाली होती; परंतु यंदाच्या हंगामात अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. महागडी बियाणे खरेदी करून पेरणीपासून मजुरी, फवारणी, नांगरणी, खते हा सर्व खर्च पाहता पूर्णत: वाया गेल्याची प्रतिक्रिया अहिरे यांनी दिली. शासनाने लष्करी अळीच्या बंदोबस्ताबाबत केलेले मार्गदर्शनही व्यर्थ ठरले आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांचे नुकसान पाहता तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लष्करी अळीला कंटाळून मक्यावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:59 IST