नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, मनसे-शिवसेना एका बाजूला, तर भाजपा-राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सर्वाधिक चुरस ही जिल्हास्तरावरील सहा संचालक पदांसाठी होणार हे, आता निश्चित झाले आहे.मंगळवारी (दि. २४) जिल्हा बॅँकेचे माजी संचालक व माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या घरी बैठक होऊन त्यात आमदार अनिल कदम, माजी संचालक नानासाहेब सोनवणे, नरेंद्र दराडे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह काही नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी सोमवारी (दि. २३) जिल्हा बॅँकेचे माजी संचालक व माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांची नाशिकमध्ये बैठक होऊन त्यात आगामी निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी संचालक राजेंद्र भोसले, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह काही नेत्यांनी हजेरी लावल्याचे कळते. बैठकीनंतर नरेंद्र दराडे व त्यांचे बंधू हेही कोकाटेंना भेटून गेल्याचे समजते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे येवल्याचे विधानसभेचे उमेदवार संभाजी पवार यांचीही बैठकीनंतर या ठिकाणी हजेरी लावल्याचे कळते. सर्वाधिक चुरस अनुसूचित जाती व जमातीच्या एका संचालक पदासाठी असून, त्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आमदार जे. पी. गावित, आमदार निर्मल गावित, माजी आमदार बबनराव घोलप, नामदेव हलकंदर, जि. प. सदस्य भास्कर गावित, माजी संचालक नानासाहेब सोनवणे यांची नावे चर्चेत आहेत. महिला राखीव गटातून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, डॉ. सुचेता बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. उर्वरित १५ तालुका प्रतिनिधी संचालक पदासाठी डझनभर आजी-माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)
आजी-माजी लोकप्रतिनिधी येणार आमने-सामने
By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST