नाशिक : गोदावरी नदीपात्रातील १७ प्राचीन कुंड कॉँक्रीटमुक्त करून पुनर्जीवित करण्यासंबंधी उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेनुसार महापालिकेने केलेला खुलासा असमाधानकारक व हास्यास्पद असून, त्याबाबत पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे याचिकाकर्ते देवांग जानी यांनी म्हटले आहे. जनहित याचिकेच्या निकालपत्रात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार याचिकाकर्ता देवांग जानी यांना महापालिका आयुक्तांपुढे लेखी पुराव्यासह तांत्रिक अहवालासह सादरीकरण केले होते. त्यानंतर महापालिकेने देवांग जानी यांच्या प्रत्येक मुद्द्यावर खुलासा पाठविला आहे. मात्र, सदर खुलासा हा असमाधानकारक असून, महापालिकेच्या नरो वा कुंजरोवा या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करत पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे जानी यांनी स्पष्ट केले आहे. जानी यांनी म्हटले आहे, आयुक्तांनी सिंहस्थात करण्यात आलेल्या नदीपात्रातील कॉँक्रिटीकरणाबद्दल काहीच भाष्य न करता गोदावरी नदीकाठावरील कॉँक्रिटीकरणाचा उल्लेख केला आहे. त्यात विविध समित्यांचा हवाला देत भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे. आयुक्त व प्रशासन हास्यास्पद उत्तर देत असून, मूळ मागणीला बगल देण्याचे काम करीत असल्याचा आरोप जानी यांनी केला आहे. अरुणा नदीच्या स्त्रोतसंदर्भात मालेगाव स्टॅण्ड समांतर उताराखाली अरुणा नदीचे अस्तित्व असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.
प्राचीन कुंड कॉँक्रिटीकरणमुक्त करण्यासाठी पुन्हा याचिका
By admin | Updated: April 27, 2017 01:31 IST