नाशिक : महिला साध्वींच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था व वेळ यासाठी साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्याबाबत न्यायालयाने मध्यस्थी केंद्राचा पर्याय सुचविला होता़ त्यानुसार सोमवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांची बैठक झाली़ मात्र त्यावर एकमत न झाल्याने मंगळवारी (दि़१) पुन्हा बैठक होणार आहे़साधू-महंतांच्या शाहीस्नानानंतर प्रशासनाने महिला साध्वींसाठी स्वतंत्र वेळ व स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी साध्वी त्रिकाल भवंता यांनी न्यायालयात दावा दाखल केला असून, सीताकुंड वा नारोशंकर मंदिराजवळील जागेची मागणी केली आहे़ वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश राजेश पटारे यांनी याबाबत मध्यस्थी केंद्राचा पर्याय सुचविला होता़ त्यानुसार सोमवारी मध्यस्थी केंद्राची बैठक झाली़ त्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी प्रारंभी ऐन वेळेला नियोजनात बदल करणे शक्य नाही, या भूमिकेवर ठाम राहिले़ तसेच शाही पर्वणी सोडून इतर मुहूर्तावर स्नान केल्यास व्यवस्था तयार असल्याचे सांगितले़ मात्र यास साध्वी तयार नव्हत्या़ या बैठकीला महंत राजेंद्रदास, धरमदास, साध्वी त्रिकाल भवंता, अॅड़ प्रशांत जोशी, अॅड़ गोपीनाथ तिडके, अॅड़ अजय मिसर, अॅड़ मुकुंद कुलकर्णी, अॅड़ विश्वास पारख, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, महेश पाटील उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
साध्वींच्या स्वतंत्र स्नानाबाबत आज पुन्हा मध्यस्थी
By admin | Updated: September 1, 2015 00:02 IST