नाशिक : काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर झळकलेल्या ‘स्वामी’ मालिकेची आठवण करून देणारा ‘रमा-माधव’ हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर येत्या ८ आॅगस्टला प्रदर्शित होत असून, ‘स्वामी’ मालिकेत रमा-माधवची भूमिका करणारे मृणाल कुलकर्णी व रवींद्र मंकणी ही जोडी गोपिकाबाई व नानासाहेब पेशवे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून नानासाहेब पेशवे यांची भूमिका साकारत रवींद्र मंकणी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत पेशवे घराण्यातील सर्व पेशवे साकारण्याचा एक विक्रम केला आहे. ‘रमा-माधव’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. ‘स्वामी’ या दूरदर्शन मालिकेत मृणाल कुलकर्णी यांनी रमाबाई, तर रवींद्र मंकणी यांनी माधवराव पेशव्याची भूमिका साकारली होती. आता दीर्घ कालावधीनंतर ‘रमा-माधव’ या चित्रपटाच्या माध्यमातून पेशवेकाळ उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चित्रपटात मृणाल-रवींद्र ही जोडी गोपिकाबाई व नानासाहेब पेशवा ह्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात राघोबादादांची व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारत आहे, तर आनंदीबाईच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अलोक राजवाडे व पर्ण पेठे ही नवोदित जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. अलोकने माधवराव पेशवा, तर पर्ण पेठे हिने रमाबाईची तरुणपणीची भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हे सदाशिवरावभाऊ, तर श्रुती मराठे पार्वतीबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बालपणीची रमाबाई श्रुती कार्लेकरने साकारली आहे. याशिवाय चित्रपटात सुचित्रा बांदेकर, योगेश सोमण, अन्वय बेंद्रे, सुनील गोडबोले, महेश पाटणकर, ज्ञानेश वाडेकर, संतोष सराफ व आनंद देशपांडे यांच्यादेखील भूमिका आहेत. (प्रतिनिधी)
मालिकेनंतर चित्रपटात झळकणार ‘रमा-माधव’
By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST