लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत नसल्याच्या निषेधार्थ आदिवासी तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयातच प्रतीकात्मक शाळा भरवित ठिय्या आंदोलन सुरू केले.दरम्यान, आदिवासी विकास आयुक्त कुलकर्णी यांच्याशी चर्चेनंतर तोडगा न निघाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक आंदोलन सुरूच ठेवले. शासन स्तरावरूनच प्रवेशाचा निर्णय होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना आयुक्तांनी सांगितले.पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील सुमारे शंभर ते दोनशे पालक व बालकांनी अखिल भारतीय विकास परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी आयुक्तालयात मोर्चा आणला. आठ दिवसांपूर्वीच पेठरोडवरील एकलव्य आदिवासी इंग्रजी शाळेत पहिलीसाठी प्रवेशाच्या दोनशे जागा असताना प्रत्यक्षात ५०० प्रवेश अर्ज आल्याने आदिवासी पालकांनी नाशिक प्रकल्प अधिकारी अमोल एडगे यांना घेराव घातला होता. त्यानंतर या पालकांनी बालकांसह आदिवासी विकास आयुक्तालयात मोर्चा आणत प्रवेशासाठी मागणी केली होती. आठ दिवसांत प्रवेशाबाबत शासन स्तरावरून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता आठ दिवस उलटल्यानंतरही काही कार्यवाही न झाल्याने या चारही तालुक्यातील पालकांनी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातच प्रतीकात्मक पहिलीचे वर्ग भरविले.
प्रवेशासाठी आदिवासी आयुक्तालयातच भरली ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:23 IST