नाशिक : गुजरात राज्यातील विनापरवाना वाळू नाशिकमध्ये विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती मिळताच नगरच्या गौण खनिज पथकाने नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास चोरटी वाळू वाहतूक रोखून नऊ वाहने ताब्यात घेतली आहेत. या कारवाईची माहिती पथकाने तहसीलदारांना दिल्यानंतर त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन १४ लाखांचा दंड आकारला आहे. सिडकोतील लेखानगरजवळील एका बड्या ठेकेदाराकडे धाड टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
गुजरात राज्याच्या सीमेवरील तापी नदीतून अनधिकृतपणे उपसा केलेली वाळू नाशिकमध्ये विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती नगरच्या गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर मध्यरात्रीच आलेल्या पथकाने याबाबतची माहिती नाशिक तहसीलदारांना दिली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास मुंबई - आग्रा महामार्गावरील लेखानगर परिसरात गुजरातहून आलेल्या वाळूने भरलेल्या ट्रक्स पथकाला आढळून आल्या. या कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १३ ब्रास वाळू तसेच नऊ वाहने जप्त करण्यात आली असून, १४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
चोरट्या मार्गाने गुजरातहून नाशिकमध्ये आलेल्या वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली असता. त्यातील काही वाहनांमध्ये वाळू भरलेली असल्याची आढळून आली तर काही ट्रक्समधील वाळू अन्य वाहनात भरली जात असल्याचे पथकाला आढळून आले. वाहने जप्त करण्यात आल्यानंतर संशयितांकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता त्यांच्याकडे कोणत्याही पावत्या अथवा कागदपत्रे नसल्याचे चौकशीत समोर आले.
--इन्फो--
अवैध चोरटी वाहतूक रोखण्यासाठी विभागस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी विभागात धडक कारवाई सुरू केलेली आहे. विभागीय पथकामध्ये एका जिल्ह्यातील गौण खनिज पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कारवाई करीत आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील पथकाने नाशिकमध्ये कारवाई केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील पथकाने नगर जिल्ह्यात जाऊन अवैध वाळूचोरी विरुद्ध कारवाई केली आहे. (फोटो: ६९/७०)
160721\16nsk_30_16072021_13.jpg
जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.