नाशिक : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पतंगबाजीचा उत्साह संचारलेला असताना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम विसरून नायलॉन मांजाची खरेदी व विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात फास आवळला आहे. शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात कारवाई करीत तब्बल २४ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा हस्तगत केला आहे. उपनगरमधील नीलेश प्रकाश खत्री (२५) यांच्या इच्छामणी जनरल स्टोअर्समधून १४ हजार ७०० रुपये किमतीचे २१ गट्टू, चार हजार ४०० रुपयांचे २२ लहान आकाराच्या चक्री व सातशे रुपयांचे अर्धवट वापरलेले सात गट्टू असा एकूण १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तर अंबडच्या उत्तमनगर महाविद्यालयासमोरील परिसरातून पोलिसांनी दोन वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून १५०० व ११०० रुपये किमतीचा मांजा चक्रीसह हस्तगत केला. भद्रकाली परिसरात केलेल्या कारवाईत दूधबाजार परिसरात १५०० रुपये कि मतीचा नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला. याच परिसरातील सचिन पतंग स्टॉल या दुकानातून ९०० रुपयांचा असा एकूण २४०० रुपयांचा मांजा पोलिसांनी हस्तगत केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
नायलॉन मांजाविरोधात कारवाई
By admin | Updated: January 14, 2017 01:06 IST