मालेगाव : नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा जाब विचारून मारहाण केल्याचा राग मनात धरून नागेश श्रावण पवार (१९) रा. मांडवड याने रणजीत दामू आहेर (४५) रा. मांडवड यांचा कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याप्रकरणी नागेश याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. बहाळकर यांनी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१३ एप्रिल २०१९ रोजी मांडवड गावात हा खुनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तरुणीने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मयत आहेर यांनी त्यांच्या मुलीशी प्रेमसंबंध हाेते असा जाब विचारून नागेशला काठीने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून नागेशने रणजीत आहेर यांच्यावर कुऱ्हाडीने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता, तर तुषार रणजीत आहेर हा देखील जखमी झाला होता. सदरचा खून खटला येथील न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अशोक पगारे यांनी कामकाज पाहिले.