ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. बँकांमध्ये नवीन खाते उघडल्यानंतर त्याच्या पासबुकची झेरॉक्स उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र, बहुतेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँका सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगास प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर, निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँकेसह शेड्युल व सहकारी बँकांमध्ये खाते उघडण्यास अनुमती दिली आहे. याशिवाय सर्व राष्ट्रीयकृत बँकांना निवडणूक कामी खाते उघडणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी धावपळ करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. त्यांना आता गाव पातळीवरील सहकारी बँकांमध्येही खाते उघडून त्याचे पासबुक उमेदवारी अर्जासोबत जोडता येणार आहे. सिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका सोबतच असल्याने, सर्व इच्छुक उमेदवारांची बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी विचारणा होती. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांकडून सहकार्य केले जात नव्हते.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहकारी बँकेतही उघडता येणार खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:11 IST