ऑनलाइन लोकमक
नाशिक, दि. 21 - उंटवाडी रोडवर धावत्या इस्टीम कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी संध्याकाळच्या सांयकाळच्या सुमारास घडली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत कुटुंबीयांना त्वरीत खाली उतरवल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील रहिवासी संजय पंढरीनाथ मोकाशी हे कुटुंबीयांसह शनिवारी सायंकाळी आपल्या इस्टीम कारने उंटवाडी परिसरातून जात होते. या दरम्यान अमोल टॉवरजवळ कारच्या इंजिनमधून धूर निघू लागल्याने मोकाशी यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेऊन कारमधील कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर कारने पेट घेतला.
दरम्यान, कारला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास कळविल्यानंतर सिडकोतील बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आग विझविली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.