७२ वर्षांचा ‘तरुण’ रामभाऊ झाला ग्रामपंचायत सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:13+5:302021-01-22T04:13:13+5:30

सिन्नर (शैलेश कर्पे) : अनेक ठिकाणी प्रस्थापितांना नाकारून तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या जात असताना सिन्नर तालुक्यातील बाजारपेठेच्या ...

The 72-year-old 'young' Rambhau became a Gram Panchayat member | ७२ वर्षांचा ‘तरुण’ रामभाऊ झाला ग्रामपंचायत सदस्य

७२ वर्षांचा ‘तरुण’ रामभाऊ झाला ग्रामपंचायत सदस्य

Next

सिन्नर (शैलेश कर्पे) : अनेक ठिकाणी प्रस्थापितांना नाकारून तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या जात असताना सिन्नर तालुक्यातील बाजारपेठेच्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रामभाऊ ताजणे या ७२ वर्षीय ज्येष्ठाने तरुणांनाही लाजवेल अशी लढत देत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

केवळ नावापुरती लढत न देता ‘दोन हात आणि तिसरे मस्तक’ या प्रचारतंत्राचा अवलंब करीत ‘विजयश्री’ अक्षरश: खेचून आणण्याची किमया ‘रामभाऊ’ यांनी साधली आहे. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित ९२० सदस्यांमध्ये ‘रामभाऊ’ ताजणे यांनी वयाने सर्वांत ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळविला आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की धावपळ, दगदग आणि टेन्शन ओघानेच येतेच. त्यामुळे निवडणुकीत तिकीट देताना ‘तरुणांना’ प्राधान्य दिले जाते. मात्र वावीच्या वॉर्ड नंबर ३ची निवडणूक काहीशी आगळीवेगळी ठरली. दोन तरुणतुर्क तिशीतील उमेदवार आणि ७२ वर्षीय ज्येष्ठाच्या लढाईत ‘रामभाऊ’ यांनी बाजी मारली. निमोणीचा मळा, माडीचा मळा, खळवाडी, ढगाईचा मळा आणि बराचसा मोठा परिसर असलेल्या वॉर्ड तीन हा भौगोलिकदृष्ट्या वावीचा सर्वांत मोठा वॉर्ड होता. त्यामुळे सत्ताधारी श्री गुरुकृपा पॅनलने तरुण उमेदवाराला तिकीट देणे पसंत केले. तर अन्य एका तरुण उमेदवारानेही अपक्ष म्हणून या निवडणुकीत उडी घेतली. तथापि, परिवर्तन पॅनलने अनुभवी व ज्येष्ठ असलेल्या रामभाऊ(रामराव) ताजणे या ७२ वर्षीय तरुणाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. सुमारे एक हजारांच्या आसपास मतदारसंख्या असल्याने या वॉर्डात मतदानासाठी दोन मतदान केंद्र होते. दोन तरुण उमेदवारांविरुद्ध रामभाऊ यांची लढत अटीतटीची होती. मात्र रामभाऊ यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पायाला भिंगरी बांधल्यागत मळेतळे पायदळी तुडवले. ताजणे यांना मिळालेली ४६३ मते ही विरोधी दोन उमेदवारांच्या बेरजेपेक्षाही जास्त आहेत हे विशेष. (२१ रामभाऊ ताजणे)

----------------------

विरोधी एकमेव सदस्य

सडपातळ शरीरयष्टी, अंगात सफेद पायजमा शर्ट, डोक्यात टोपी आणि गळ्यात उपरणे असा साधा पेहराव असणाऱ्या रामभाऊ यांनी दिलेली लढत जेवढी वाखण्याजोगी होती, तेवढीच त्यांनी खेचून आणलेली ‘विजयश्री’ चर्चेचा विषय ठरली. वयाच्या ७२व्या वर्षी दोन तरुणांना निवडणूक आखाड्यात चितपट करण्याची किमया करणारे ‘रामभाऊ’ चर्चेतील सदस्य ठरले आहेत. विशेष म्हणजे वावीत श्री गुरुकृपा पॅनलचे ११ पैकी १० सदस्य निवडून आले असताना विरोधी परिवर्तन पॅनलकडून रामभाऊ ताजणे हे एकमेव विरोधी सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.

===Photopath===

210121\21nsk_16_21012021_13.jpg

===Caption===

२१ रामभाऊ ताजणे

Web Title: The 72-year-old 'young' Rambhau became a Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.