इंदिरानगर : घरकुले देऊनही मूळ झोपड्या न हटविणाऱ्या भारतनगर आणि शिवाजीवाडी येथील लाभार्थ्यांना महापालिकेने शनिवारी दणका दिला. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम राबवत ६१ झोपड्या आणि पाच दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेने भारतनगर-शिवाजीवाडी येथील झोपडपट्टीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी घरकुल योजना राबविली. दोन टप्प्यांत योजनेची सोडत काढण्यात येऊन लाभार्थ्यांना घराचा ताबाही देण्यात आला, परंतु घरकुल योजनेचा लाभ घेतानाच सुमारे ६५ लाभार्थ्यांनी आपल्या मूळ झोपड्यांचा कब्जा काही सोडला नव्हता. काही लाभार्थ्यांनी घरे खाली न करताच स्वत:च तेथे राहणे पसंत केले होते, तर काहींनी भाडेतत्त्वावर झोपड्या दिल्या होत्या. महापालिकेने संबंधित लाभार्थ्यांना झोपड्या काढून घेण्यासंबंधी नोटिसाही बजावल्या होत्या, परंतु भारतनगर व शिवाजीवाडी येथील लाभार्थ्यांनी ताबा सोडला नव्हता. महापालिकेने मध्यंतरी रेड मार्किंगही केले होते. त्यामुळे काही लाभार्थ्यांनी स्वत:हून घरांचे कच्चे व पक्के बांधकाम काढून घेतले. मात्र ज्यांनी झोपड्या स्वत:हून हटविल्या नाहीत त्यांच्या झोपड्या हटविण्याची मोहीम शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने राबविली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला काही महिलांनी पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पथकाने सुमारे ६१ कच्च्या व पक्क्या स्वरूपाच्या झोपड्या आणि पाच दुकानांचे अतिक्रमण हटविले. यावेळी नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकारी वसुधा कुरणावळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन, दोन सहायक पोलीस निरीक्षक, आठ उपनिरीक्षक, सुमारे ६० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवाजीवाडीतील ६१ झोपड्या जमीनदोस्त
By admin | Updated: June 5, 2016 00:15 IST