नाशिक : बारतोंडी, कोकम, निरगुडी, कळम, पळस, हिरडा, रिठा अशा एक ना अनेक आयुर्वेदिक प्रजातींच्या सुमारे ५५ रोपांची लागवड धन्वंतरी जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आली. आरोग्याची देवता मानल्या जाणाऱ्या धन्वंतरीचे पूजन सोमवारी (दि.९) करण्यात आले. यानिमित्ताने ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ने आगळ्या संकल्पनेतून धन्वंतरी जयंती साजरी केली. यावेळी बोधलेनगर ड्रीमसिटी चौकाच्या परिसरातील मोकळ्या जागेवर सुमारे बहुगुणी औषधी प्रजातीच्या ५५ रोपांची लागवड रहिवाशांच्या मदतीने करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात दुर्मिळ झालेल्या भारतीय प्रजातीची रोपे लावून त्याचे संवर्धनाचे कार्य करणाऱ्या आपलं पर्यावरण गु्रप या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘नाशिक देवराई’ (फाशीचा डोंगर) येथे आपट्याची रोपे लावून अनोखे सीमोल्लंघन क रत लक्षवेधी उपक्रम राबविला होता. त्याचप्रमाणे धन्वंतरी जयंतीच्या औचित्यावर लोकसहभागातून पुत्रंजीवा, बकुळ, बुचपांगारा, अर्जुन, रायआवळा, रुद्राक्ष, बहावा यांसारख्या आयुर्वेदिक बहुगुणी औषधी वनस्पतींच्या प्रजातींची रोपे लावण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, डॉ. विनोद गुजराथी, डॉ. वर्षा चिट्टीवाड, डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. अभिनंदन कोठारी, डॉ. सुनील औंधकर, डॉ. प्रतीभा औंधकर यांच्यासह शिवसृष्टी स्प्रिंग व्हॅली मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५५ बहुगुणी औषधी प्रजातींची लागवड
By admin | Updated: November 9, 2015 23:48 IST