नाशिक : विविध कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘शिवराय’ वाद्य पथकाने ५१ कला-ताल, श्लोक ही संकल्पना घेऊन तब्बल सहा तास ढोलवादनाबरोबरच ५१ कलांचा आविष्कार सादर करत विश्वविक्रम नोंदविला. यावेळी कलाविष्कारासह ‘एक ताल एक श्लोक’ यांचा आगळा संगम पहावयास मिळाला.शिवराय वाद्य पथकाने शहरातील गंगापूररोड परिसरातील विश्वास लॉन्स येथे रविवारी (दि.६) ढोलवादनाचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी शुभश्री बहुउद्देशीय संस्थेच्या विविध चित्रकार, शिल्पकार, कलाकारांनी तब्बल ५१ पेक्षा अधिक कलांमधून विविध नावीन्यपूर्ण कलाकृतींचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस श्लोकचे पठण करत उपस्थित वादक, कलाकार, चित्रकारांना ऊर्जा दिली. तब्बल दोनशे वादकांनी शिवताल, ढोलीबाजा, गझर, नाशिक ढोल, भीमरूपी, भांगडा, पुणे ढोल, संबळ, रमण बाग अशा एकापेक्षा एक सुमारे ५१ तालांवर वादकांनी ढोल-ताशाचे वादन करीत विक्रम नोंदविला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. नेहरू सदरा त्यावर लाल जॅकेट अशा पोशाखात सर्व वादकांनी ढोलवादनामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, या उपक्रमाची नोंद जिनिअस बुक, एशिया बुक व वर्ल्ड रेकॉर्ड बुक इंडिया, वंडर बुक आॅफ लंडन यामध्ये या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे. तसेच लिम्का बुकसाठी या उपक्रमाचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती अमी छेडा यांनी दिली.