नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा नंबर मिळवून दोन भावांच्या बँक खात्यातील पन्नास हजार रुपयांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून घेतल्याची घटना जयभवानी परिसरात घडली आहे़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्रसिंग कृष्णसिंग गुर्जर (रा.जयभवानी रोड) यांच्या मोबाइलवर मंगळवारी दुपारच्या सुमारास फोन आला, स्टेट बँक आॅफ इंडियातील अधिकारी बोलत असल्याचे या भामट्याने सांगून गुर्जर व त्यांच्या भावाचा एटीएम कार्डचा सोळा अंकी नंबर व ओटीपी नंबर माहिती घेतली़ यानंतर आॅनलाइन पद्धतीने दहा हजार, १९ हजार ९०० , १८ हजार व १ हजार ९९९ असे ४९ हजार ९९८ रुपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेतले़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारांबाबत जनतेने काळजी घेण्याचे आवाहन पोलीसांतर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
एटीएम कार्डद्वारे ५० हजारांचा अपहार
By admin | Updated: February 5, 2017 22:38 IST