मालेगाव : राज्यातील विविध भागात अपुऱ्या पावसामुळे सन २०१५ मध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना महसूल नोंदीनुसार विशिष्ट निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात निधी वाटप झाला होता. यासंदर्भात दादा भुसे यांनी सदर बाब मंत्रिपरिषद बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार शासनाच्या महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार २३७.४६ कोटी निधीचे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यासाठी ४८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.२०१५ मध्ये अल्प पर्जन्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांच्या शेतात तर पीकच उगवले नव्हते व काही शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना शासनाने लागलीच मदतही केली होती. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला निधी प्राप्त होताच तत्काळ वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर हा निधी तसाच पडून राहिला असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा भुसे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ४८.९१ कोटी रुपये मंजूर
By admin | Updated: September 26, 2016 23:31 IST