जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:08 PM2020-01-29T23:08:22+5:302020-01-30T00:10:35+5:30

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे.

4,000 children in the district on the threshold of malnutrition | जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देशहरी भागातही लोण : आदिवासी विभागात समस्या गंभीर

नाशिक : जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना आता शहरी व सुखवस्तू भागातही कुपोषित बालके आढळून आल्याने आरोग्य व महिला, बाल कल्याण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असून, या भागातील नागरिक शेती व शेतमजुरीवर अवलंबून असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही पोटभर अन्नपाणी मिळण्यापेक्षाही आरोग्याविषयी अनास्था, अल्पवयात लग्न व गर्भारपण व त्यातूनच कुपोषित बालकांना जन्म देण्याचे प्रमाण अधिक आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी करावे लागणारे स्थलांतर, आरोग्य सुविधांचा अभाव या गोष्टीही कुपोषणाला पूरक ठरल्या आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न करूनही आदिवासी भागात कुपोषित बालकांना जन्म देण्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नसला तरी, आरोग्य विभाग व महिला-बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कमी वजनाच्या बालकांचे वजन वाढविण्यात यश मिळाले आहे. मात्र पूर्वी फक्त आदिवासी भागापुरताच मर्यादित असलेला कुपोषणाचा विळखा आता बिगर आदिवासी तालुके व शहरी भागालाही बसू लागला आहे. डिसेंबर महिन्यात बिगर आदिवासी तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील ३ लाख १८ हजार ६६० बालकांच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या ३७८६६ इतकी होती तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या १०१५६ इतकी राहिली. मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २८२४ इतकी आहे तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ६६३ इतकी आहे. आदिवासी क्षेत्रातील एक लाख ५६ हजार ७१८ बालकांपैकी एक लाख ५० हजार ९८१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २४२१६ इतकी असून, तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ६९४८ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०३८ इतकी आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४७८ इतकी असून, आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यातील बालकांची एकूण संख्या पाहता सुमारे २२ हजार बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता कमी वजनाच्या बालकांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, याशिवाय अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार व आशा कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवून त्यांचे वजन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

शहरी भागाला विळखा
जिल्ह्णातील बिगर आदिवासी तालुक्यांमध्येही कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून, सर्वाधिक कुपोषित बालके नांदगाव तालुक्यात ४९८ इतकी आढळली आहेत. त्याखालोखाल बागलाण (३५९), मालेगाव (३३६), चांदवड (२९०), निफाड (२६४), मनमाड (२५५) बालके कुपोषित आढळून आली आहेत.

Web Title: 4,000 children in the district on the threshold of malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.