नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन संपावर ठाम असून प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी अद्याप संप मागे घेण्यासंदर्भात कुठलीही घोषणा केलेली नाही. बुधवारी रात्रीपासून नाशिकमधील सुमारे ४ हजार खासगी डॉक्टरांनी ‘सेवा’ बंद केली असून संपामध्ये सहभाग नोंदविला आहे.यामुळे शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना थेट महापालिका व जिल्हा शासकिय रुग्णालयांचा रस्ता दाखविला जात आहे. यामुळे सकाळी महापालिका व शासकिय रुग्णालयांच्या दवाखान्यात बाह्यरुग्ण तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. जिल्हा शासकिय रुग्णालयाने खासगी डॉक्टरांचा संप लक्षात घेता अतिरिक्त स्टाफ नियुक्त केला आहे. रात्रपाळीकरणाऱ्या डॉक्टरांनाही रुग्णालयात दिवसपाळीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय सेवा सक्षमपणे दिली जात असून गरजू रुग्णांनी थेट जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक होले यांनी केले आहे. एकीकडे दिवस-रात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टर सेवा देण्यासाठी हजर असताना दुसरीकडे मात्र खासगी डॉक्टरांनी सेवा न देण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निश्चय केला आहे. यामुळे वैद्यकिय क्षेत्रातील विरोधाभास सध्या शहरात पहावयास मिळत आहे. आयएमएचे शहराध्यक्ष डॉ. अनिरुध्द भांडारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहरातील चार हजार डॉक्टर संपामध्ये सहभागी असून खासगी रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही; मात्र जे रुग्ण रुग्णालयात आगोदरपासून उपचारार्थ दाखल आहेत, त्यांच्यावर पुर्ण क्षमतेने उपचार केले जात आहे. गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयात जाऊन निशुल्क सेवा देण्यासाठीही आयएमए नाशिक शाखेचे सर्व सदस्य डॉक्टर तयार आहे.
४ हजार डॉक्टरांचा संप : जिल्हा रुग्णालयात रात्रपाळीच्या डॉक्टरांना पाचारण
By admin | Updated: March 23, 2017 13:59 IST