नाशिक : येथील इंदिरानगर परिसरातील एका इंग्रजी शाळेने फी भरली नसल्याचे कारण दाखवत इयत्ता पहिली ते दहावीच्या सुमारे ३३ विद्यार्थ्यांचे दाखले थेट टपालाने पालकांच्या पत्त्यावर पाठवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संतप्त पालकांनी दाखले घेऊन महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला आणि सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी यावेळी केली. इंदिरानगरच्या केंब्रिज या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने ३३ विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांनी शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारणावरून टपालाने घरी पाठवून दिले. तसेच सदर विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासही मज्जाव करण्यात आला. याबरोबरच पालकांनाही शाळेत प्रवेश बंदी करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत प्रशासनधिकारी व शिक्षण उपसंचालकांनी कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शाळेच्या आवारात तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे अखेर प्रशासनधिकारी नितीन उपासणी यांनी शाळेला हजेरी लावली आणि उपस्थित पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
...३३ विद्यार्थ्यांचे दाखले थेट टपालाने : केंब्रिज शाळा
By admin | Updated: June 8, 2017 22:16 IST