नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसेच नियोजन केले आहे. मतदानसाहित्य आणि कर्मचारी यांची ने - आण करण्यासाठी ३२८ बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. महामंडळाच्या नैमित्तिक करारानुसार या बसेस दोन दिवसांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या बसेसने साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वाहन म्हणून बसेसचा वापर केला जातो. महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ७५ बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, तर पालिका हद्दीतील ग्रामीण भागासाठीदेखील सात बसेस आरक्षित आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठीदेखील एकाच दिवशी मतदान असल्याने ग्रामीण भागासाठीही बसेस राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. मालेगावसाठी २६, सटाणा - २३, मनमाड - १४, नांदगाव - १८, इगतपुरी - २०, लासलगाव -४४, सिन्नर - २३, कळवण - २७, येवला - २२ आणि पिंपळगाव येथे २७ याप्रमाणे बसेस देण्यात आलेल्या आहेत. त्र्यंबकरोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोरून कर्मचाऱ्यांना तालुकानिहाय बसेस देण्यात आल्या. सकाळी कर्मचाऱ्यांनी निवडणूक साहित्य घेऊन बसेस आपापल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाल्या. (प्रतिनिधी)
मतदान प्रक्रियेसाठी ३२८ बसेस
By admin | Updated: February 21, 2017 01:17 IST