नाशिक : महापालिका महासभेने दीर्घमुदतीसाठी घंटागाडीचा ठेका देण्यास विरोध दर्शवूनही तीन नव्हे, तर दहा वर्षे मुदतीसाठी ठेका देण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून, त्याकरिता येत्या बुधवारी (दि.१४) महापौर-उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या सुरतवारीचे आयोजन करण्यात आले आहे. सुरतच्या या तीन तासांच्या अभ्यास दौऱ्यात सुमारे तीनशे कोटींच्या ठेक्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मात्र आतापासून दीर्घमुदतीच्या ठेक्याविरोधात ढोल वाजविण्यास सुरुवात केली असून, दौऱ्यात सहभागी न होण्याचे ठरविले आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी एप्रिलच्या महासभेत ‘वाहनांचे जेवढे आयुष्य तेवढेच ठेक्याचे आयुष्य’ या धर्तीवर घंटागाडीचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा ठेका दहा वर्षे कालावधी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, महासभेने दीर्घमुदतीच्या ठेक्यातील अनेक धोके लक्षात घेऊन आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यावेळी महापौरांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठीच ठेका देताना एका ठेकेदारास तीनपेक्षा अधिक विभाग न देण्याचे आदेशित केले होते, शिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीपूर्वी निविदाप्रक्रिया राबविण्याच्याही सूचना दिल्या होत्या. मात्र, कुंभपर्वणी संपल्या तरी घंटागाडीच्या निविदा प्रक्रियेला मुहूर्त लाभू शकलेला नाही. प्रशासनाने आता पुन्हा एकदा दहा वर्षे घंटागाडीच्या ठेक्यासाठी उचल खाल्ली असून, त्यात सत्ताधारी मनसेच्याही पदाधिकाऱ्यांची भाषा बदलली आहे.
तीन तासांच्या दौऱ्यात 300 कोटींचा निर्णय?
By admin | Updated: October 12, 2015 23:56 IST