नाशिक : कॉपीसारख्या गैरमार्गांचा अवलंब टाळण्यासाठी शनिवारी दहावीच्या इंग्रजी पेपरच्या दिवशी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २९ कापीबहाद्दर आढळले असून, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने सध्या दहावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. इंग्रजी आणि गणित या दोन विषयांना मोठ्या प्रमाणात कॉप्या होत असल्याने यंदा त्यावर लक्ष केंद्रित करून विशेष पथके तयार करण्यात आली होती. एकूण २९ पथके नियुक्त करून विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २९ कॉपीबहाद्दर आढळले आहेत.
इंग्रजी विषयाच्या परीक्षेसाठी एकूण एक लाख ९८ हजार विद्यार्थी नाशिक विभागात प्रविष्ट होते. शिक्षण विभागाच्या वतीने नऊ नियमित पथकांच्या व्यतिरिक्त अन्य वीस पथके नियुक्त करून जिल्हाभरात तपासणी करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. आत्तापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ११० कॉपीबहाद्दर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी (दि.१४) गणित विषयाचा पेपर असून, त्यासाठी एक लाख ७३ हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. या पेपरच्या दिवशीही कॉपीबहाद्दर शोधण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.