नाशिक - फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने शहरात सहाही विभागमिळून २२५ हॉकर्स झोन निश्चित केले परंतु, आतापर्यंत केवळ ४६ ठिकाणीच महापालिका हॉकर्स झोन कार्यान्वित करू शकली असून २६ ठिकाणांबाबतचा तिढा कायम आहे. याबाबत, महापौर रंजना भानसी यांनी बैठक बोलावत आढावा घेतला आणि वाद असलेल्या ठिकाणांविषयी चर्चा करून पर्यायी जागांचा विचार करण्याचे आणि महिनाभरात हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.महापालिकेने हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली असली तरी प्रशासनाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच, हॉकर्स व टपरीधारक संघटनांनी प्रस्तावित हॉकर्स झोनला विरोध दर्शवत आहे त्याच जागांवर व्यवसाय करण्याची मागणी केलेली आहे. परंतु, प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत आराखड्यानुसारच हॉकर्स झोन कार्यान्वित केले जातील, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संघर्ष वाढत आहे. या सा-या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी ‘रामायण’ या निवासस्थानी हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांची बैठक घेत हॉकर्स झोनच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीची माहिती दिली. शहरात सहाही विभागमिळून एकूण २२५ हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून त्याला महासभेची मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार, आतापर्यंत ४६ ठिकाणी हॉकर्स झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत तर १५३ ठिकाणी कार्यवाही सुरू आहे. मात्र, २६ झोनबाबत निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यावेळी, महापौरांनी शहरात किरकोळ अपवाद वगळता हॉकर्स झोनचे सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच नाशिक पश्चिमसह पंचवटी, नाशिकरोड, सिडको व सातपूर भागातील वादग्रस्त असलेल्या २६ झोनबाबत संघटनेच्या पदाधिकारी व मनपाचे अधिकारी यांनी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन पर्यायी जागांविषयी विचारविनिमय करावा आणि एक महिन्यात समन्वयाने प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना महापौर रंजना भानसी यांनी केल्या. हॉकर्सला उपजिविकेसाठी जागाही मिळाली पाहिजे आणि मनपाला करही मिळाला पाहिजे. याशिवाय, नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत झोन तयार करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले. बैठकीला मनपाचे पदाधिकारी व हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरातील २६ हॉकर्स झोन ठरले वादग्रस्त, तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 19:13 IST
महापौरांकडे बैठक : महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश
नाशिक शहरातील २६ हॉकर्स झोन ठरले वादग्रस्त, तिढा कायम
ठळक मुद्देआतापर्यंत केवळ ४६ ठिकाणीच महापालिका हॉकर्स झोन कार्यान्वित हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली असली तरी प्रशासनाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र