सिडको : विविध भागांमधून चोरी केलेल्या दुचाकी विक्रीसाठी पाथर्डी फाटा येथे येणार असल्याची गुप्त माहिती अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. चोरटे दुचाकी घेऊन आले असता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, यावेळी एक संशयित निसटून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पाच लाख ३० हजार किमतीच्या एकूण २४ दुचाकी पोलिसांनी संशयिताकडून हस्तगत केल्या आहेत.पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व गुन्हे शोध पथकाने वेळोवेळी तपास करत दुचाकी चोरट्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, गुप्त माहितीगाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काही सराईत चोरटे जिल्ह्यातून पाथर्डी फाटा येथे दुचाकी विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली होती. मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांनी पाथर्डी फाटा येथे सापळा रचला. शुभम शंकर गोडसे (२१, रा.कुंदेवाडी, सिन्नर) व त्याचा साथीदार गोकूळ शिवाजी गणेशकट (रा.इगतपुरी) हे दुचाकी विक्री करण्याच्या हेतूने आले. दरम्यान, पोलिसांनी गोडसे यास शिताफीने ताब्यात घेतले; मात्र गणेशकट हा पोलिसांच्या सापळ्यातून निसटला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या संशयितालादेखील लवकरत अटक केली जाईल, व त्याच्याकडून आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान, चोरट्याकडून स्प्लेंडर, सीबीझेड, होंडा शाईन, पल्सर-२२०, अॅक्टिवा आदि प्रकारच्या एकूण पाच लाख ३० हजार रुपये किमतीच्या २४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, दत्तात्रय विसे, अनिल दिघोळे, शंकर काळे आदिंनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
पाच लाखांच्या २४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 23:38 IST