नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील अंजनेरीजवळील तुपादेवी फाट्यावर भरधाव स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली़ या मुलाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नसून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुपादेवी फाट्यावर दोन लहान मुले रस्ता ओलांडत होती़ यावेळी भरधाव आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच ०३, बीएच ८६३३) ने यातील एका मुलास जोरात धडक दिली़ यामध्ये एका बारा वर्षीय मुलाचे डोके, तोंड व छातीस जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले़ यावेळी तेथे उपस्थित असलेले अन्वर शेख या युवकाने तत्काळ या मुलाला याच कारमध्ये बसवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी डॉ़ खेरकर यांनी तपासून या मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले़ या प्रकरणी कारचालक राजेंद्र ओमकार बागुल यास ताब्यात घेण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
कारने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
By admin | Updated: April 22, 2015 01:47 IST