कळवण : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित महिला राखीव असल्याने पुरुषांचा चांगलाच भ्रमनिरास व हिरमोड झाला आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला गेल्याने फोडाफोडीचे प्रयत्न केले जात आहेत. नवी बेजच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. ११ जुलै रोजी सरपंच व उपसरपंचपदासाठी तालुक्यात निवडणूक होणार आहे.कळवण तालुक्यातील वडाळे वणी, साकोरे, आठंबे, गोबापूर, नाकोडे, पाटविहीर, जुनी बेज, भेंडी, नवी बेज, विसापूर, मोकभणगी, दरेभणगी, खेडगाव, दह्याणे दिगर, भैताणे दिगर, ककाणे, मळगाव बु।।, धार्डे दिगर, पिंपळे बु।।, नाळीद, गणोरे आदि ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.नवी बेजच्या विकासासाठी मतभेद व मनभेद यांना तिलांजली देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला असून, सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. २२ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आदिवासी अनुसूचित जमाती राखीव झाल्याने मोकभणगी गावातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. (वार्ताहर)
12 सरपंचपदे अनुसूचित महिलांसाठी राखीव
By admin | Updated: July 8, 2016 23:02 IST