पंचवटी : पंधरा दिवसांपूर्वी नांदूर नाक्यावरील एका मोबाइल दुकानाचा पत्रा उचकावून ७२ हजार रुपयांचे विविध कंपनीचे १७ मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्याला आडगाव पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. अनिल शरद माळी (रा.माडसांगवी) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ७२ हजार रुपयांचे ११ मोबाइल जप्त केले आहेत.
पंधरवड्यापूर्वी जेलरोड येथे राहणारे फिर्यादी अविनाश अडसूळ यांच्या मालकीचे नांदूर नाक्यावर असलेले जय जनार्दन मोबाइल शॉप कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडले होते. दुकानातून ७१ हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे एकूण १७ मोबाइल चोरी झाले होते. याबाबत अडसूळ यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शोध पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित माळी यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी माळी यास अटक केली असून, त्याच्याकडून ११ मोबाइल जप्त करण्यात आले आहे.