जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये घटना व्यवस्थापक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अधिग्रहीत केले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचे संशयित रुग्णांना केअर सेंटरमध्ये तर प्रकृती गंभीर असलेल्यांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. कोरोना ऐन भरात असताना त्याला अटकाव करण्यासाठी हे सेंटर उपयोगी ठरले होते. हजारो रुग्णांवर या ठिकाणी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यात आले, त्यामुळे हे सेंटर कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले होते. जानेवारीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून, विशेष करून ग्रामीण भागात प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आजवर कार्यरत असलेल्या कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यात ११ कोविड सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले असून, काही सेंटर कोविडसाठी बंद करण्यात येऊन आठ ठिकाणी फीवर क्लिनिक सेंटर सुरू करण्याचे आदेश आहेेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्याही खाटा कमी करण्यात येऊन त्यात काही खाटा नॉनकोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
बंद करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये देवळाली कॅम्प, इगतपुरीची एकलव्य आश्रमशाळा, दिंडोरी येथील बोपेगाव शासकीय आश्रमशाळा, अजमेर सौदाणे येथील एकलव्य आश्रमशाळा, साकोरे येथील सारताळे आश्रमशाळा, नांदगावच्या सेंट झेविअर स्कूल, येवला येथील आदिवासी विकास वसतिगृह, दाभाडी येथील हिरे विद्यालय, लासलगाव महावीर स्कूल, लासलगाव ग्रामीण रूग्णालय, देवळा येथील विद्यानिकेत स्कूलचा समावेश आहे.
चौकट===
या ठिकाणी होणार फीव्हर क्लिनिक
सटाणा येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह, कळवणच्या मानूर येथील शासकीय वसतिगृह, पेठचे आदिवासी वसतिगृह, देेवळा येथील वसतिगृह या ठिकाणी कोविड केअर सेंटर बंद करून फीव्हर क्लिनिक सेंटर सुरू करण्यात येत आहे.