नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा...’ अशी तोफांच्या साक्षीने शपथ घेत ३३३ जवानांची (गनर) तुकडी ‘उमराव’ मैदानातून भारतीय तोफखान्यात दाखल झाली. यावेळी जवानांनी केलेले सशस्त्र संचलन डोळ्यांची पारणे फेडणारे होते.निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. शनिवारी (दि.८) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले. यावेळी तोफखान्याच्या बॅन्ड पथकाने वाजविलेली विविध देशभक्तीपर धूनने जवानांचा उत्साह वाढविला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल आॅफ आर्टिलरीच्या गनरी शाखेचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल पी.रमेश उपस्थित होते. त्यांना तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी उमराव कवायत मैदानाच्या सलामीमंचावर लष्करी थाटात आणले. यानंतर धीमण यांनी शपथविधी सोहळ्याचे समीक्षण करत मैदानाची जिप्सीमधून पाहणी केली.या सोहळ्याप्रसंगी पी. रमेश म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवा. तोफखाना केंद्राचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशाचे रक्षण हाच आहे. आपल्या अंगावरील वर्दीचे महत्त्व लक्षात घेत तीचा सन्मान करत तुम्ही ‘तोपची’ म्हणून भारतीय सेनेत अभिमानास्पद कामगिरी करावी आणि आपल्या तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व सैनिक आपली जबाबदारी चोखपणे बजावतील. सैनिक धर्म व सैनिकी शिस्त आयुष्यात कधीही कोठेही विसरता कामा नये, असा गुरूमंत्रही यावेळी दिला.
३३३ नवसैनिक भारतीय तोफखान्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:03 IST
४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले.
३३३ नवसैनिक भारतीय तोफखान्यात दाखल
ठळक मुद्दे३३३ जवानांची (गनर) तुकडी ‘उमराव’ मैदानातून... सैनिक धर्म व सैनिकी शिस्त आयुष्यात विसरता कामा नये