याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर येथील यशोधन विंग-ड मधील रो-हाऊसमध्ये राहणारे संतोष मधुकर सोनवणे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून घरात असलेल्या तिजोरीवर डल्ला मारत दागिने लांबिवले. यामध्ये ७० हजारांची सोन्याची पोत, २२ हजार ५०० रुपयांचे कानातील झुबे, तीन हजारांचे ओम पान, दोन हजारांच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. तसेच दीड हजारांची रोकडही चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
----
दुकानाचे शटर उचकटून दुचाकी लांबविल्या
नाशिक : पंचवटी पोलीस ठाणेहद्दीतील मालेगाव स्टॅन्डवरील कपालेश्वर वाहन बाजाराचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून ८० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात वाहन बाजारचे मालक फिर्यादी संजय विष्णुपंत पगारे (५१,रा.टकलेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीची पल्सर (एम.एच१५ एफ.एक्स ७१९७) तसेच २० हजार रुपये किमतीची टीव्हीएस अपाचे दुचाकी (एम.एच.१५जीबी६३९९) या दुचाकी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
----
मतिमंद विद्यालयातून दोन भाऊ बेपत्ता
नाशिक : म्हसरुळजवळील पेठरोडच्या तवलीफाटा येथील मतिमंद विद्यालयातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी विश्वास वामन अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यालयातील गोपी राजेंद्र अपसुंदे (वय १०), गोरख राजेंद्र अपसुंदे (१२,दोघे.रा. पाडा, ता.दिंडोरी) हे दोघे भावंडं विद्यालयातून दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या दोन्ही विशेष बालकांना फूस लावून पळवून नेल्याची शक्यता फिर्यादीत वर्तविण्यात आली आहे. पुढील तपास म्हसरुळ पाेलीस करत आहेत.