रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह पाच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा:या पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राष्ट्रपती राजवटीचा या निवडणुकीला कुठलाही अडसर नसल्याने पुढील आठवडय़ात होणा:या उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ पुर्ण झाला असून वर्षभरापासून तेथे प्रशासक आहेत. या निवडणुकांसदर्भात अनेक ठिकाणी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्याबाबतच्या सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या याद्या प्रसिद्ध होऊन त्यावरील हरकतींवरही सुनावणी झाली असून अंतिम मतदार याद्या तयार झाल्या आहेत.याच पाश्र्वभुमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीने वेगळा रंग घेतला. कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याशिवाय काँगेंस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाशिवआघाडी तयार झाली असून या आघाडीचे सरकार पुढच्या काही दिवसात सत्तेवर येईल असे चित्र आहे. अर्थात राज्यात सत्ता स्थापन होईल किंवा राष्ट्रपती राजवट लांबली तरी जिल्हा परिषद निवडणुकीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली.त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसदर्भात आता एका याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतची कार्यवाही सुरू असून निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीला राष्ट्रपती राजवटीचा अडसर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:23 IST