नंदुरबार : असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना लागू करण्यात आली आह़े 15 फेब्रुवारीपासून या योजनेचे काम देशभरात सुरु झाले आह़े परंतू जिल्ह्यातील तीन तालुक्यात कामगार नोंदण्याच नसल्याची माहिती असून नोंदणी केंद्राची स्थापना अद्याप जिल्ह्यात झालेली नाही़ जिल्ह्यातील तळोदा, शहादा आणि नंदुरबार या तीन तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील कामगारांच्या नोंदण्या दरवर्षी करण्यात येतात़ यानुसार 8 हजार 559 कामगार नोंदणीकृत आहेत़ योजनेत सहभागी झाल्यानंतर या कामगारांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन देण्याचे निश्चित मानले जात आह़े तर दुसरीकडे अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर येथील बांधकाम कामगार वगळता असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या नोंदण्याच नसल्याने तेथील कामगार या योजनेपासून वंचित राहणार असल्याची चिन्हे आहेत़ 18 ते 40 वयोगटातील किमान 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्नधारक असंघटित कामगारांसाठी ऐच्छिक निवृत्तीवेतन देण्याची ही योजना आह़े योजनेत सहभाग दिल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपयांचे पेन्शन देण्यात येणार असून लाभार्थीच्या निवृत्तीवेतनाचा निधी एलआयसीकडे जमा करण्यात येऊन पेन्शन देण्याचे नियोजन केंद्रशासनाकडून करण्यात आले आह़े या कामगारांच्या नोंदणीसाठी सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ दोन दिवसांपूर्वी योजना सुरु झाली असली तरी जिल्ह्यात कामगार नोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत़ धुळे येथील कामगार अधिकारी यांच्याकडे नंदुरबार कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आह़े जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहता योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करुन कामकाज करण्याची अपेक्षा कामगार संघटनांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
श्रमयोगी मानधन योजनेपासून तीन तालुक्यांचे कामगार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:52 IST