लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘जे झालं ते गंगेला न्हालं’ असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने कामाला लागा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. या वेळी व्यासपीठावरील पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्धार केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी येथे तैलीक मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला. मेळाव्याला अभिजित मोरे, ग्राहक सेलचे अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, राजेंद्र वाघ, शांतीलाल साळी, नगरसेवक ईकबाल शेख, रवींद्र मुसळदे, तोरणमाळचे माजी सरपंच सीताराम पावरा, उमाकांत पाटील, अलका जोंधळे आदी उपस्थित होते.नंदुरबार जिल्ह्यात कोणता राजकारणी कोणत्या पक्षात आहे हेच समजत नाही. राजकारणात नेता हा त्याच्या चारित्र्याने ओळखला जातो. मी कार्यकर्त्यांचा पराभव सहन करेन पण लज्जास्पद पराभव सहन करणार नाही. दुकानदारी चालू ठेवणारे कार्यकर्ते चालणार नाही. कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावून वातावरण निर्मिती करून गाव तेथे राष्ट्रवादीची शाखा उघडण्याची सूचना देऊन जिल्ह्यातील वाड्या-पाड्यांवरील रस्ते तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात विकास राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झाला. गटातटाचे राजकारण न करता पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवा. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन अनिल गोटे यांनी दिले. डॉ.अभिजित मोरे, शांतीलाल साळी, उपसरपंच डी.जी. मोरे, सुभाष शेमळे, उमाकांत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यकर्त्यांनी नव्या दमाने कामाला लागावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:45 IST