आदिवासी उपयोजने अंतर्गत डेब्रामाळ येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पाण्याची टाकी, सोलर विहीर, पाण्याची मोटर व पाईपलाईन करून काम २०-२१ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. मात्र या सोलर नळपाणीपुरवठ्याच्या निकृष्ट कामामुळे काहीच उपयोग होत नसून, जमिनीवरच सोलर लावण्यात आले आहे. विहिरीजवळील भाग खचून धोकेदायक झालेला आहे व कमी पाॅवरच्या मोटारीमुळे पाणीच चढत नसल्याने लाखो रुपये खर्च झालेल्या या योजनेवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली असताना याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित करून डेब्रामाळ गावकऱ्यांना पाण्यासाठी या नळपाणीपुरवठा योजनेचा उन्हाळ्यात उपयोग होत नसून, गावकऱ्यांंना डोंगराच्या चढउताराच्या खडतर पायवाटेने अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत पाणी आणावे लागत आहे. या नळपाणीपुरवठा योजने अंतर्गत डेब्रामाळ गावकऱ्यांना पाणीच मिळत नसल्याने गावकऱ्यांची पाण्याची तहान काही भागेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कमी दाबाची मोटर असल्याने चढावाच्या भागात पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची टाकी व अधिक दाबाच्या मोटारव्दारे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. -भीमसिग वळवी, सरपंच डेब्रामाळ
डेब्रामाळ गावकऱ्यांना या नळपाणी पुरवठा योजनेचे काम चागल्या दर्जाचे करून देत पाण्याची सोय करण्यात यावी. - सखाराम वळवी, ग्रामस्थ, डेब्रामाळ