नंदुरबार : लॅाकडाऊनच्या काळात घरगुती वादाचे प्रकार कमी होण्याऐवजी ते कायम राहिल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लॅाकडाऊनमध्येदेखील कौटुंबिक हिंसाचारातून महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याचे प्रकार घडले. तर गेल्या मार्च २०२० पासून मे २०२१ पर्यंत तब्बल ३५० तक्रारी अर्ज भरोसा सेलमध्ये दाखल झाले होते. त्यातील अनेक प्रकरणे ही तडजोडी करून आपसात मिटविण्यात आले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतांना सावरले गेले.
कौटुंबिक हिंसाचारासह इतर माध्यमातून महिलांवर होणारे अन्याय, त्रास देण्याचे प्रकार कायमच आहेत. कोरोना काळातदेखील ते कमी झाले नाहीत. महिलांवरील अत्याचाराबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात भरोसा सेल कार्यरत आहे. महिलांचे समुपदेशन करून होणारे अत्याचार, अन्याय याबाबत माहिती घेऊन त्यातून मार्ग काढला जातो. काैटुंबिक वाद असल्यास त्यातदेखील दोन्ही बाजुंकडील म्हणने ऐकून त्यातून कौटुंबिक समझोता केला जातो. त्यामुळे अनेकांचे संसार तुटताना वाचले आहेत. काही वेळा आपसात समझोता झाला नाही तर थेट गुन्हे दाखल करण्यास संबंधित तक्रारदाराला सांगण्यात येते. अत्याचाराची बाब गंभीर असेल आणि त्यातून महिलेचे मानसिक खच्चीकरण केले गेले असेल तर या सेलच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करून त्यांना धीर दिला जातो. यासाठी या सेलमध्ये चार महिला व एक पुरुष कर्मचारी असे पाचजण कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून तक्रारी सोडविल्या जात असतात.