उत्तरकार्य व साखरपुडा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:02 PM2020-03-27T13:02:04+5:302020-03-27T13:02:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी तालुक्यातील मोदलपाडा गावदेखील पुढे सरसावले आहे. नागरिकांचा समुदाय एकत्र येऊ ...

 Uttarakari and Sugarpuda canceled | उत्तरकार्य व साखरपुडा रद्द

उत्तरकार्य व साखरपुडा रद्द

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी तालुक्यातील मोदलपाडा गावदेखील पुढे सरसावले आहे. नागरिकांचा समुदाय एकत्र येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी नियोजित दोन उत्तरकार्ये व साखरपुड्याचा कार्यक्रम पुढे ढकलले आहे. गावातील पंच मंडळाच्या या स्तुत्य कामगिरीचे कौतुक केले जात आहे. मोदलपाडा वासियांचा असा आदर्श इतरांनीही घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोना या घातक रोगाने संपूर्ण जगातच थैमान घातले आहे. आपल्या देशातही अशा संशयित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. त्याचावर अजून कुठलाही असा ठोस औषधोपचार नाही. केवळ नागरिकांचा आपसातील संपर्कच त्यावर प्रभावी उपचार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत त्याबाबतची जनजागृती गावकऱ्यांमध्ये केली जात आहे. मोदलपाडा येथील नियोजित दोन उत्तरकार्ये व साखरपुडा रद्द करण्यात आला आहे. कारण गावातील रोहिदास जोत्र्या वसावे यांच्याकडे त्यांचे वडील कै.जोत्र्या वसावे यांच्या उत्तरकार्याचा कार्यक्रम २८ व २९ रोजी नियोजित करण्यात आला होता. याशिवाय गावातीलच रोहिदास बाबू पाडवी यांची पत्नी कै.कुसूमबाई पाडवी यांचाही उत्तरकार्याचा कार्यक्रम ३० व ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र गावातील पंचमंडळी बळीराम पाडवी, पोलीस पाटील विलास पाडवी, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश गावीत, काळूसिंग वळवी, गिरा पडवी, भानू वळवी, दिलीप वळवी आदी पंचमंडळाने या तिन्ही कुटुंबातील प्रमुख सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलावून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा केली. या घातक महामारीला रोखण्यासाठी नागरिकांचा आपसातील मोठा संपर्क टाळणे हीच प्रमुख उपाययोजना आहे. शिवाय कार्यक्रमात बहुसंख्येने लोक एकत्र येईल त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली. पंच मंडळाने केलेल्या विनंतीस प्रतिसाद देवून या दोन्ही कुटुंबांनी आपले नियोजीत कार्यक्रम पुढे ढकलले. याशिवाय गणेश शामा वळवी यांचा मुलगा राजेश याचाही साखरपुडा कार्यक्रम निश्चित केला होता. तोही पंच मंडळाच्या विनंतीवरून रद्द करण्यात आला आहे. अशा धोरणात्मक निर्णयाबरोबरच मोदलपाड्यातील हे पंच मंडळ गावात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहे. जे कोणी गुजरातमधून अथवा बाहेर गावाहून आले आहेत त्यांना आरोग्य तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवित आहेत. साहजिकच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदलपाडाकरांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Web Title:  Uttarakari and Sugarpuda canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.