बेशिस्त वाहतुकीने शहादेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:56 PM2018-05-20T12:56:15+5:302018-05-20T12:56:15+5:30

रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाच : जीवघेणी प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांचा सर्रास वावर

Unconsciously shocked Shahadekar | बेशिस्त वाहतुकीने शहादेकर त्रस्त

बेशिस्त वाहतुकीने शहादेकर त्रस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नुकतेच राबविण्यात आलेले राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान फक्त नावापुरतेच राबविण्यात आल्याची स्थिती शहरातील वाहतूक व्यवस्थेवरून दिसून येते. या अभियानात जनजागृतीसाठी सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून शहरातील मुख्य रस्ते व चौकांमधील बेशिस्त वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहर व परिसरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक होत आहे. बसस्थानक परिसर, गांधी पुतळा, स्टेट बँक परिसर, मेनरोड आदी रस्ते व चौकांमध्ये बेशिस्त वाहने चालविण्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरातील डोंगरगाव रस्त्यावर खाजगी वाहतूक करणा:या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होते. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता वाहनाच्या मागील बाजूस उभे राहून प्रवास करतात. बसस्थानक परिसरातही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता रस्त्यातच उभी केली जातात. याठिकाणी बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने व बसस्थानकात येणा:या-जाणा:या बसेसमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. या परिसरात नेमणुकीला असलेले वाहतूक पोलीसदेखील बघ्याची भूमिका घेतात. गांधी पुतळा परिसरात एकेरी मार्ग असूनदेखील वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. डायमंड बेकरीजवळ तीनचाकी व अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना दिवसभर याठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होते.
नुकत्याच राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यासाठी पोलीस विभागातर्फे विविध उपक्रमही राबविण्यात आले. मात्र वाहने बेशिस्तपणे चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतुकीची वारंवार कोंडी होणे हे प्रकार पुन्हा        सुरू झाल्याने रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा:या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊन वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होणार आहे.
 

Web Title: Unconsciously shocked Shahadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.