लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : नंदूरबार येथील रेल्वे स्थानकवर उभ्या असलेल्या पॅसेंजर गाडीत बेवारसरित्या आढळून आलेल्या सात महिन्याच्या बालिकेस बाल कल्याण समितीने औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल केले. दरम्यान, दोन दिवस जिल्हा रुग्णालयात बालिकेवर उपचार करून तिच्या नातेवाईकांची प्रतिक्षा करण्यात आली. शेवटी कुणीच न आल्यान व बालिकेची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर शिशुगृहात पाठविण्यात आले.नंदुरबार रेल्वे स्थानकावर गुरुवार 12 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक तीनवर सुरत-भुसावळ पॅसेंजरच्या बोगी क्रमांक चार मध्ये एक सात महिन्याची बालिका आढळली होती. बालिका एकटीच रडत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर गार्ड संदीप तायडे यांना त्याची माहिती देण्यात आली. गार्डने ही बाब स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आणली. स्टेशन मास्तरने रेल्वे पोलीसांना चौकशी करण्यास सांगितले असता त्याठिकाणी बालिकेची आई अथवा कोणतेही पालक आढळून आले नाही. इतर प्रवाश्यांना विचारणा केली असता या बलिकेची आई तिला टाकून सुरत कडे जाणा:या रेल्वेत निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सदर बालिकेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. दिनेश सूर्यवंशी, नीलिमा वळवी यांनी उपचार केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांनी बालिका सापडल्याची माहिती जिल्हा बाल कल्याण समितीला कळवली. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन माहिती करून घेऊन बालिकेचे नामकरण परी असे केले. तिला औरंगाबाद येथील शिशुगृहात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबधितांना पाचारण करण्यात आले. या प्रसंगी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्रा. ईश्वर धामणे, सदस्य प्रा. अविनाश माळी,अॅड. संजय पुराणिक, शोभा आफ्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनीता फुलपगारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते, डॉ. दिनेश सूर्यवंशी, नीलिमा वळवी, शिशुगृहच्या ममता मोरे, रेल्वे पोलीस ठाण्याच्या अनिता चौधरी, जिल्हा रुग्णालयाच्या स्वाती कोकुळे, सरिता वसावे आदी उपस्थित होते .
निर्दयी मातेने बालिकेला सोडले बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:06 IST