>> रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रयागराज येथील महाकुंभात आपले आकर्षक डोळे व सौदर्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली 'मोनालिसा' या रुद्राक्ष विक्रेती तरुणीची जादू तोरणमाळ यात्रेतही पाहायला मिळत आहे. याठिकाणी १०० पेक्षा अधिक रूद्राक्ष विक्रेते दाखल झाले असून, हे सर्वच विक्रेते या 'मोनालिसा'शी नाते असल्याचे सांगून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील या यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे तोरणमाळचे पठार भाविकांनी गच्च भरले आहे. तोरणमाळ येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर गोरक्षनाथांची यात्रा भरते.
या यात्रेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरातमधून लाखो भाविक येतात. त्यामुळे यात्रेत विविध वस्तूंच्या विक्रेत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. विशेषतः रूद्राक्ष, मणि आणि देवदेवतांचे मूर्ती विक्री करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. या वर्षीदेखील सुमारे १०० पेक्षा अधिक रूद्राक्ष विक्रेते येथे दाखल झाले आहेत. यातील बहुतांश विक्रेते हे मध्यप्रदेशातील असल्याने सहाजिकच ते आपण 'मोनालीसा'च्या गावाचे असल्याचे सांगतात. तर काही जण थेट तिच्याशी नाते असल्याचेही सांगतात. मोनालिसा हीसुद्धा मध्यप्रदेशातील महेश्वरची आहे आणि आता तिला सिनेमात काम करण्याची संधीही मिळाली आहे.
मोनालिसा कुणाची कोण, काय आहेत दावे?
आपण महेश्वर येथील रहिवासी असून, 'मोनालिसा' आपली भाची आहे.- रूद्राक्ष विक्रेती जमनाबाई
'मोनालिसा' आपल्या आत्याची मुलगी आहे. आपणही आता प्रयागराज येथूनच येत असून, सुरूवातीला आपण तिच्या जवळच होतो. सध्या ती नेपाळमध्ये असून, उद्यापासून तिची शूटिंग सुरू होणार आहे.- संजना, मोनालिसाची सहकारी विक्रेती
मोनालिसा ही माझी नातेवाईक आहे.- मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील राजू उर्फ सुरेश पवार
मोनालिसा ही माझ्या बहिणीची मुलगी. आपण तिची मावशी आहोत.- सिंधूबाई पवार
आपण महेश्वर येथील असून, 'मोनालीसा'च्या घराजवळच राहतो.-ईशीका व यश, मोनालिसाचे शेजारी