लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाली असून त्यात आता कुठलीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे लवकरच राज्यात ही आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी दिली.काँग्रेसचे नेते आमदार अॅड.के.सी.पाडवी हे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी व्हावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेसच्या समितीतील ज्येष्ठ सदस्य आहेत. या समितीने दोन्ही पक्षांबरोबरच पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेवून महाशिवआघाडीबाबत चर्चा केली आहे. या पाश्र्वभुमीवर आमदार पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले की, या आघाडीबाबत आता कुठलीही अडचण राहिलेली नाही. या तिन्ही पक्षांनी काही समान मुद्यांवर चर्चा करून मसुदाही तयार केला आहे. सरकार पाच वर्ष कसे चालेल याची पुर्ण काळजी हे मुद्दे तयार करतांना घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे रविवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेवून या सर्व मुद्यांना अंतिम स्वरूप देतील. त्यानंतर लवकरच राज्यात सत्ता स्थापन होईल असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री व इतर मुद्यांविषयी विचारले असता त्यांनी त्याबाबत टाळले.
काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेना आघाडीसाठी कुठलीही अडचण नाही-आमदार पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:32 IST