नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील केलखाडी नदीवर ३ महिन्यांत साकव बांधला जाईल. तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पादचारी पूल तयार करता येईल का? याची चाचपणी केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली.
केलखेडी येथील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध करताच प्रशासन जागे झाले. जिल्हाधिकारी सेठी यांनी अक्कलकुवा तालुका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करीत उपायांबाबत माहिती घेतली. त्यानंतर या ठिकाणी तीन महिन्याच्या आत साकवचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून दोन दिवसात आराखडा मंजूर होणार आहे. सद्यस्थितीत तात्पुरती उपाययोजना म्हणून लोखंडी पादचारी पूल तयार करता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू आहे. गंगापूर ग्रामपंचायतीअंतर्गत केलखेडी गाव येते ते ग्रामपंचायतीपासून २५ किमी अंतरावर असल्याने येथे समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले.