नंदुरबार : जिल्ह्यातील ३६८ ग्रामपंचायतींची मुदत चालू वर्षात संपत आहे. दोन टप्प्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्हे होती. यातून प्रभाग रचना कार्यक्रम आणि ९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवून कामकाज सुरू होते; परंतु कोरोनामुळे या सर्व प्रक्रियेला ब्रेक लागला असून, जूनअखेरीस ९१ प्रशासकांची मुदतही संपत आहे. यातून आयोगाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे संबंधित ग्रामपंचायतींचे लक्ष लागून आहे.
चालू वर्षात जानेवारी ते डिसेंबर या काळात ३६४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यात शहादा तालुक्यातील ७५, नंदुरबार ७६, धडगाव ३३, अक्कलकुवा ४५, तळोदा ५४, तर नवापूर तालुक्यात सर्वाधिक ८१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ९१ ग्रामपंचायतींवर प्रशासनाने डिसेंबर महिन्यातच प्रशासक नियुक्त केले होते. सोबत प्रभाग रचना कार्यक्रमही सुरू केला होता. कोरोनामुळे हा कार्यक्रम स्थगित झाला होता. यातून दुसरी लाट आल्यानंतर मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत निवडणुका रखडल्या होत्या; परंतु आता दुसरी लाट ओसरल्यानंतर थांबविण्यात आलेला प्रभाग रचना कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता असून लवकरच शासनाकडून याबाबतचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
तर निवडणुका सप्टेंबरमध्ये थांबलेला प्रभाग रचना कार्यक्रम हा १० दिवसांचा आहे. जूनअखेर हा कार्यक्रम पूर्ण झाल्यास जुलै किंवा ऑगस्टमध्ये एक महिन्याचा मतदार यादी कार्यक्रम होऊन अधिसूचना लागू होत सप्टेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्यास निवडणूक आयोगाकडून प्राधान्याने जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम सुरू होऊ शकतो. आयोगाने ११ जागांचा हा कार्यक्रम घोषित केल्यास ऑगस्टमध्ये निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
प्रशासकांना मुदतवाढ मिळणार !
आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या ९१ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत जूनअखेर संपणार आहे. यातून या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम सुरू न झाल्यास त्यांना मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, एकीकडे ९१ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत संपत असताना जानेवारी ते डिसेंबरदरम्यान चार टप्प्यांत मुदत संपणाऱ्या २७४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू न झाल्यास त्या ठिकाणीही प्रशासक नियुक्त करून कामकाज केले जाण्याची शक्यता आहे.
यंदाचे वर्ष हे ग्रामपंचायत निवडणूक वर्ष असल्याचे गेल्या वर्षापासून सांगण्यात येत होते. गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यापासून ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यक्रम मात्र कोरोनामुळे थांबविण्यात आले आहेत. निवडणुका होत नसल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज रखडत असल्याचा दावा त्या-त्या गावांमधून होत आहे.
जानेवारी ते जुलै या काळात धडगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यात तोरणमाळ, राजबर्डी, खुंटामोडी, सुरवाणी या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहे.
जानेवारी ते जुलै या काळात अक्कलकुवा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात नाला, भांग्रापाणी, जमाना वाण्याविहीर राजमोही, ब्रिटिश अंकुशविहीर, डाब व वडफळी या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शहादा तालुक्यात जुलै २०२१ पर्यंत एकूण ७४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यात प्रकाशा, वैजाली, पुरुषोत्तमनगर, लोणखेडा, आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. राजकीयदृष्ट्या या ग्रामपंचायती महत्त्वपूर्ण मानल्या जातात.
नंदुरबार तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींची मुदत ही जुलै ते ऑक्टोबरदरम्यान संपत आहे. यात नटावद, ठाणेपाडा, कोठली, दुधाळे, इंद्रीहट्टी व होळ तर्फ हवेली या मोठ्या ग्रामपंचायती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
तळोदा तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची मुदत जुलै महिन्यात संपत आहे. यात सोमावल बुद्रुक व खुर्द, प्रतापपूर, रोझवे, चिनोदा, धवळीविहीर, मोड, आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टाेबर महिन्यापर्यंत संपत आहे. यात खांडबारा, चिंचपाडा, नवागाव, डोगेगाव, आदी मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे.