नंदुरबार : कोरोना साथीला आळा बसावा यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यातून ३१ मे अखेरीस विविध सहव्याधी असलेल्या अडीच हजारजणांना संदर्भ सेवेसाठी पाठवण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅब तपासून त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाकडून ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यासाठी ९०० पथकांच्या माध्यमातून अडीच हजार कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत होते. यातून १६ लाख लोकसंख्येपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन त्यांची तपासणी केली आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के लोकांपर्यंत ही पथके गेल्याने हे सर्वेक्षण पूर्णत्त्वास आल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात ताप असलेले, ऑक्सिजन पातळी कमी असलेले, इतर किरकोळ लक्षणे, तसेच सारीचे रुग्ण आढळून आले होते. सर्वेक्षणात आढळून आलेल्या रुग्णांना सहव्याधी असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यात आली होती. यातील बहुतांशजण हे रोगमुक्त आहेत.
जिल्ह्यात सारीचे एकूण १५२ रुग्ण आले समोर
जिल्ह्यात कोरोनासोबत सारीचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात वाढले होते. न्यूमोनिया असलेल्या या रुग्णांना कोरोना असल्याचे सांगून त्यांच्यावर उपचार करूनही ते बरे होत नसल्याचे दिसून आले होते. या सर्वेक्षणात नंदुरबार तालुक्यात १४५, नवापूर २, शहादा २, तळोदा १ तर अक्कलकुवा तालुक्यात चारजणांना सारीची लागण झाल्याचे समोर आले होते. आढळून आलेले सर्व रुग्ण हे १५ वर्ष वयोगटावरील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नंदुरबार तालुक्यातील एकूण ३ लाख ५१ हजार ८३१ नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य पथकांनी केले होते. यातील १४५ जणांना सारीची लागण झाल्याचे समोर आले होते. यात नंदुरबार शहर व परिसरातील १०४, तर ग्रामीण भागातील ४१ जणांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
पुढे काय?
सर्वेक्षणात शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यात रुग्ण समोर आले आहेत. मधुमेह, दमा, रक्तदाब यासह विविध आजार असलेल्यांची संख्या समोर आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय किंवा ते रुग्ण उपचार घेतलेल्या दवाखान्यांमध्ये दाखल होण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून जिल्ह्यात माझे कुटुंब अंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्याने आजारपण असलेले नागरिक स्वत:ची काळजी घेत आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाकडून माझे कुटुंब हे सर्वेक्षण अत्यंत गतीने चालवले आहे. ९५ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणातून अडीच हजारजणांना स्वॅबसाठी संदर्भित करण्यात आले होते. यातील केवळ २६७ जण हे कोविड पाॅझिटिव्ह होते. एक हजार ६९४ हे कोविड निगेटिव्ह होते. येत्या काळातही विविध आजारपण असलेल्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे सुरूच ठेवण्यात येणार आहे.
-डाॅ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.