सहायक लेखाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:01+5:302021-04-10T04:30:01+5:30

अक्कलकुवा तालुक्यात रामपूर व वेली या दोन ग्रामपंचायतींमधील प्रधानमंत्री, शबरी, इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांबाबत तक्रारी होत्या. कारण रामपूर ...

Suspension action against Assistant Accounts Officer | सहायक लेखाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

सहायक लेखाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

अक्कलकुवा तालुक्यात रामपूर व वेली या दोन ग्रामपंचायतींमधील प्रधानमंत्री, शबरी, इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांबाबत तक्रारी होत्या. कारण रामपूर येथील ११ लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. या अनुषंगाने चौकशी केली असता पात्र लाभार्थ्यांचे चुकीच्या पध्दतीने रजिस्ट्रेशन, जिओ टॅगिंग, ऑर्डरशी जनरेटर, एफटीओ साईन करून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर घरकुलाची रक्कम वितरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय वेली येथील १७ लाभार्थ्यांना शबरी, इंदिरा व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ चुकीच्या पध्दतीने मंजूर केल्याचे दिसून येते. शासनाच्या भारत मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०१९-२० मधील वैयक्तिक शौचालय अनुदानाची रक्कम, खर्च याचे प्रपत्राची मागणी करूनही त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केल्याने साहजिक कामात कुचराई केली आहे. त्यामुळे अक्कलकुवा पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी भिमसींग राया पाडवी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेशदेखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहे. त्यांना सध्या नवापूर पंचायत समितीत कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील घरकूल योजनेच्या अनियमिततेचा प्रश्न थेट खासदार डाॅ.हीना गावीत यांनी दिल्लीत लावून धरला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून पहिली विकेट अक्कलकुवा पंचायत समितीत पडली आहे. साहजिकच यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची धाकधूकही वाढली आहे.

Web Title: Suspension action against Assistant Accounts Officer