नंदुरबार : मतदारसंघ लगत असलेल्या मध्यप्रदेशातील बडवाणी लोकसभा मतदारसंघातील सेंधवा येथे एका राजकीय कार्यकर्त्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आढळून आला. त्यानंतर नंदुरबार मतदारसंघातीलच शिरपूर येथे मध्यप्रदेशातील कुख्यात गँगस्टरांना अटक केल्यामुळे नंदुरबार पोलिसांची चिंता वाढली आहे. परिणामी मध्यप्रदेश सिमेवर विशेष निगराणी ठेवण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची वेळ आली आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघ मध्यप्रदेशातील एक आणि गुजरातमधील दोन लोकसभा मतदार संघाला लागून आहे. या दोन्ही राज्यांच्या सिमेवर निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, अवैध शस्त्र, गुन्हेगार यांच्यावर नजर राहावी म्हणून गेल्या चार महिन्यांपासून उपाय योजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत सहा वेळा तिन्ही राज्यातील लगतच्या जिल्ह्यांच्या सहा बॉर्डर मिटिंगा देखील झालेल्या आहेत. १६ ठिकाणी चेकनाके उभारण्यात आलेले आहेत. याच दरम्यान मध्यप्रदेशातील बडवाणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सेंधवा शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरातून हातबॉम्ब, गावठी बंदुका, पिस्तोल, काडतुसे, तलवारी असा शस्त्रसाठा आढळून आला होता. बडवाणीच्या पोलीस अधीक्षक यांगचेन डोलकर भुतीया यांनी ही थेट कारवाई केली. याच कारवाईअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार सेंधवा येथील कुख्यात टोळीतील म्होरके शिरपूर येथे लपून असल्याचे समजताच भुतीया यांनी शिरपूर येथे जावून देखील कारवाई करीत दोघांना अटक केली.या कारवाई आणि घडामोडीनंतर आता निवडणुकीच्या काळात राज्यांच्या सिमेवर विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. गुन्हे करून तिन्ही राज्यातील गुन्हेगार दुसऱ्या राज्यात पळून जात असतात. त्यामुळे चेकनाक्यांवर मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे. नंदुरबार पोलिसांना नव्याने नियोजन करून काही उपाययोजना देखील कराव्या लागणार आहेत.
सेंधवा आणि शिरपूरच्या कारवाईनंतर आंतरराज्य चेक नाक्यांवर विशेष दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:28 IST